Thursday, January 14, 2010

आयुष्य - एक प्रवास

तिसरे पान - आयुष्य - एक प्रवास

गेली अनेक वर्ष , हा अनुत्तरीत प्रश्न माझ्या डोक्यात होता. पण जिथे विचारलं , जिथे डोकावलं , जिथे कुठे शोधलं तिथे तीच चाकोरीतली उत्तरं मिळायची.


"सगळे करतात ! ते वेडे आहेत का ?" किंवा "कधीतरी तर करावंच लागणार नं ! " एक ना अनेक उत्तरं - पण सगळी  एकाच पठडीतले ...



प्रश्न एकंच " मी लग्न कां करावं ? " .

आणि लग्न केल्यानंतर सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नव्हतंच. बाकी सगळ्यांनी केलं म्हणुन मी सुद्धा केलं.


केवळ लग्नाचंच असं नाही. बाकी सगळ्या नात्या-गोत्यांची , पसार्याची सुद्धा खरंच इतकी गरज का असते आपल्याला ?

जन्मलो कि मग शाळा - कॉलेज, शिकलो कि मग नोकरी-धंदा, नंतर लग्न , घर , कार, मुलं, नंतर त्यांची मुलं ... आणि मग एक दिवस अचानक चित्रगुप्तानी यमदूताला आपलं account बंद करण्यासाठी पाठवावं आणि हा सगळा केलेला पसारा जसाच्या तसा सोडून आपण निघून जावं. मग कशासाठी करावा हा पसारा ? का मांडावा संसाराचा खेळ ?


मी काही खरं कुणी तत्ववेत्ता नाही किंवा कुणी दार्शनिकही नाही. आणि खरं तर मला आयुष्याचा फार अनुभव सुद्धा नाही. आयुष्याच्या पुस्तकात जर १० धडे असतील तर माझे कदाचित ३-४ वाचून झाले असतील जास्तीत जास्त. पण आयुष्याच्या मध्यान्ही आपलं एक आकलन म्हणून लिहून ठेवतोय. म्हातारा झाल्यावर जेव्हा मी हेच वाचीन तेव्हा कदाचित यातलं काहीच योग्य वाटणार नाही आणि हसू पण येईल. पण असो ...


ट्रेन चा प्रवास कोणाला आवडतो ? काय! आवडत नाही असं म्हणता ? का हो ? थकवा येतो म्हणता ? पण तुम्ही तर काहीच वेगळं करत नव्हता ? म्हणजे ट्रेन ला धक्का वगैरे मारत नव्हता. आपलं रोजच्या सारखंच - ऑफिस मध्ये बसायच्या ऐवजी ट्रेन मध्ये इतकंच. मग तरी थकवा का?

बरं, पण मग मित्रांसोबत केलेल्या outing मध्ये का थकला नाहीत ? तो पण तर प्रवासच होता. कारण ट्रेन मधला थकवा हा शारीरिक नव्हताच मुळी . तो मानसिक शीण होता. एकटेपणाचा शीण !



आयुष्य हा असाच एक भला मोठा प्रवास आहे. मित्र , नातलग, जवळचे असले तर याचा पिकनिक होतो नाही तर A/C मध्ये बसून सुद्धा हा जिंदगी का सफर - "सफर " (suffer) च राहतो.  या प्रवासात ज्याचं त्यांनीच ठरवायचं असतं , हळू हळू का होईना पण सगळ्यांना सोबत घेऊन जाणाऱ्या प्यासेंजर मधला प्रवासी व्हायचंय कि तुफान वेगात धावणाऱ्या , कुणासाठीहि न थांबणाऱ्या बुलेट ट्रेन मधला.

जरा मागे वळून बघा ... आठवा आपल्या आयुष्यातले सगळ्यात आनंद देणारे क्षण ...
तिथे तुम्ही एकटे आहात ?? कि आजूबाजूला तुमची - तुम्हाला आवडणारी माणसं आहेत ?

कॉलेज मध्ये मित्रांसोबत नाटकात घेतलेला पहिला नंबर असो किंवा तुम्ही मेरीट मध्ये आल्यानंतर आजी च्या डोळ्यातून निघालेलं पाणी असो.

लग्न असो , किंवा मुलानी पहिल्यांदा "बाबा" अशी मारलेली हाक असो ... प्रत्येक ठिकाणी आपली माणसं होती - जवळची माणसं होती.

कारण आनंद त्या क्षणाचा नव्हताच मुळी, तो त्या आनंदाला आपल्या जवळच्यान्सोबत share करण्याचा होता, आपल्या जवळच्यान्सोबत enjoy करण्याचा होता.

आणि हेच आयुष्याचं खरं saving - खरं भांडवल !

हेच भांडवल आपल्याला निराशेच्या गर्तेतून नवीन उभारी देतं , हेच भांडवल आपल्या भरकटलेल्या आयुष्याच्या जहाजाला शिडाच काम करतं - दिशा दाखवतं. आणि एक दिवस याच saving च्या जोरावर आपण चित्रगुप्ताच्या "Account Closure " फॉर्म वर थाटात आनंदाने सही मारून निघून जातो पुढल्या प्रवासासाठी ...

म्हातारं होई पर्यंत आपण असेच आनंदी क्षणांचे मोती आणि निराशेचे - दु:खाचे खडे आठवणींच्या Balance Sheet मध्ये गोळा करत असतो.

आयुष्याच्या शेवटी ज्याची Balance Sheet positive तोच आणि तोच खरा यशस्वी - तोच खरा विजेता !

नेहमी प्रमाणे शेवट एका आवडत्या कवितेनी करतो. सुरेश भटांची एक अप्रतिम गझल ...

आता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
माझ्या धुळीचे शेवटी येथे किती कण राहिले?                


ह्रदयात विझला चंद्रमा .. नयनी न उरल्या तारका ..
नाही म्हणायाला तुझे हे आपुलेपण राहिले


अजुनी कुणास्तव तेवतो हा मंद प्राणाचा दिवा?
अजुनी मला फसवायला हे कुठले निमंत्रण राहिले ?


ते लोक होते वेगळे घाईत जे गेले पुढे ...
मी मात्र थांबुन पाहतो मागे कितीजण राहिले ?


कवटाळुनी बसले मज दाही दिशांचे हुंदके
माझे अता दु : खासवे काही न भांडण राहिले !


होता न साधा एवढा जो शब्द मी तुजला दिला
एकाच शब्दाला उभे आयुष्य तारण राहिले!


अवघ्या विजा मी झेलल्या, सगळी उन्हे मी सोसली
रे बोल आकाशा, तुझे आता किती पण राहिले?


ओसाड माझे घर मुळी नाही बघायासारखे
हे आसवांचे तेवढे अद्याप तोरण राहिले !

तुमचा शंतनू

11 comments:

  1. अरे वा..!!! तुझ्यात ही सुद्धा कला आहे तर..खरोखर सुंदर लिखाण..!!!

    ReplyDelete
  2. khup jasthi bahri lihto re aawdle mala

    ReplyDelete
  3. खुपच छान. सुरेख वर्णन केल आहे

    ReplyDelete
  4. Hey it seems you became serious person now :). Good Write up.

    ReplyDelete
  5. आयुष्याच्या शेवटी ज्याची Balance Sheet positive तोच आणि तोच खरा यशस्वी - तोच खरा विजेता .......अप्रतिम

    ReplyDelete
  6. wow..khrach khuup chaan lekh aahe mitra

    ReplyDelete